धुळे - तालुक्यातील नगाव येथील पाटील ट्रान्समिशन वर्ल्ड या कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरोची घटना घडली होती. या घटनेत चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनमधून अॅल्युमिनियम वायर चोरून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आता दोन गुन्हेगारांनी गजाआड केले आहे.
दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अज्ञात 7 ते 8 दरोडेखोरांनी कंपनीचे वॉचमन व आजूबाजूच्या हॉटेलवरील कामगारांना मारहाण करून त्यांना एका खोलीत बंद केले होते. त्यानंतर कंपनीच्या गोडाऊनमधील अॅल्युमिनियम तार ज्याची किंमत 1 लाख 82 हजार 400 इतकी आहे, ती चोरून नेली होती. यासंदर्भात आधार शेनपडू पाटील (रा .नगाव ता जि. धुळे) यांच्या फिर्यादीवरून देवपूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो पिकअपसोबत (एम.एच. 01. एपी 2104) रिझवान शेख रहिम (रा. अजमेरा नगर धुळे) होता. त्याचा शोध घेता तो लळिंग गावात असल्याचे समजले. पोलिसांनी रिझवानला लळिंग येथून ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने 7 ते 8 साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी इम्रान खान नुरखान पठाण (रा…मोलविगंज धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेले अॅल्युमिनियम तार तसेच गुन्ह्यात वापरलेली पिकअप क्र. (एम.एच. 01. एपी 2104) असा एकूण 4 लाख 60 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.