धुळे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ट्रॅव्हलस बंगला अर्थात 'संदेश भूमी'ला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी संदेश भूमी कृती संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 31 जुलै 1937 ला बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 31 जुलै 1937 ला न्यायालयीन कामानिमित्त धुळे शहरात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम हा धुळे बसस्थानकाजवळील ट्रॅव्हल्स बंगला अर्थात संदेश भूमी याठिकाणी असल्याचा पुरावा त्यांच्या 'जनता' या वर्तमानपत्रात मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही वास्तू पावन झाली आहे, हा इतिहास जनतेला माहीत व्हावा, यासाठी तसेच या वास्तूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त होऊन याठिकाणी ग्रंथालय उभारण्यात यावे, यासाठी संदेश भूमी संवर्धन कृती समिती स्थापन करण्यात आली.
या समितीने याबाबतचे सगळे पुरावे सरकारकडे जमा केले. गेल्या अनेक वर्षांपासून ही वास्तू दुर्लक्षित झाली होती. आता या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. त्याबरोबरच छोटेखानी ग्रंथालयही सुरू करण्यात आले आहे. ३१ जुलैला बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.