धुळे- आरटीओंकडून साडेचार लाखांची मागणी करणाऱ्या धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेझ तडवी याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धडक कारवाई करून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तडवी याच्या मालमत्तेसह नातेवाईकांच्या घरांवर छापे मारले आहेत. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यातील विविध चेक पोस्टवर चक्राकार पद्धतीने ड्युटी लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेझ तडवी याने आरटीओंकडून साडेचार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर तडवी याला देवपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तेथे त्याची कसून चौकशी करण्यात आली. तसेच तडवी याच्या धुळे, जळगाव, नाशिक येथील मालमत्तासह नातेवाईकांच्या घरांवर छापे मारण्यात आले. त्या ठिकाणी देखील तपासणी करण्यात आली.
प्रादेशिक परिवहन अधिकारी तडवी याच्यावर ही दुसऱ्यांदा कारवाई होत आहे. मात्र, याआधी त्याला जामीन मिळाला होता. तडवी हा धुळ्यात कार्यरत असल्यापासून वादग्रस्त ठरला आहे. त्याच्याविरुद्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी असून तडवी याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.