धुळे - शहरासह परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नकाणे तलाव आणि हरणमाळ तलाव परिसरातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तलावांमध्ये पुरेसा जलसाठा असताना देखील प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
संपूर्ण राज्यात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. धुळे शहरासह परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई असून ७ ते ८ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलाव आणि हरणमाळ तलाव परिसरातील नागरिकांनाच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाणी भरण्यासाठी महिला सकाळपासून याठिकाणी रांगा लावत आहेत. येथील महिला गावातील सार्वजनिक हौदावर पाणी भरण्यासाठी सकाळपासून गर्दी करतात. दररोज पाणीपुरवठा होणे अपेक्षित असतानाही पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने येथील महिलांना पाण्याची तासनतास वाट पाहावी लागते. पुरेसा जलसाठा असून देखील फक्त १ तास पाणी येते. यामुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार येथील महिलांनी केली आहे. प्रशासनाने पाण्याचे नियोजन करून वेळेवर पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.