धुळे - शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे विनापरवाना बियाण्यांची विक्री करणाऱ्या बियाणे विक्री केंद्रावर जिल्हा कृषी नियंत्रण पथकामार्फत धाड टाकली. या कारवाईत ३ लाख ६५ हजार किंमतीचे विनापरवाना बियाण्यांचे पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा कृषी नियंत्रण पथकाला मिळालेल्या गुपीत माहितीनुसार दोंडाईचा येथील जयचंद्रा कृषी बियाणे विक्री केंद्रावर विनापरवाना बियाणे अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा कृषी नियंत्रण पथकामार्फत मोठी कारवाई करण्यात आली. दुकानासह सरस्वती कॉलनीतील गोडाऊनची तपासणी करण्यात आली. त्यात परवाना नसतांना अनाधिकृतरित्या खरबूज बियाणे 25 ग्रॅम वजनाचे 32 पाकिटे प्रत्येकी अकराशे रुपयेप्रमाणे व टरबूज बियाण्यांची पन्नास ग्रॅमची 50 पाकीटे 450 रुपये किमतीचे असे एकूण 3 लाख 65 हजार 994 रुपये किंमतीचे बी-बियाण्यांचे अनधिकृतरित्या साठवणूक केल्याचे आढळून आले.
सदर बियाणे विकण्यास परवानगी नसल्याने जिल्हा नियंत्रण गुणवत्ता कृषी अधिकारी मनोजकुमार सिसोदे यांच्या पथकाने जीवनावश्यक वस्तू साठवण कायद्यान्वये दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे संशयित चंद्रकांत ताराचंद पाटील (रा. भादवड ता.नंदुरबार )याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कृषी अधिकारी मनोजकुमार सिसोदे, विवेककुमार सोनवणे, भालचंद्र बैसाणे, रमेश नेतनराव, नीतीन साळुंखे यांच्या पथकाने केली. सदर कारवाईमुळे अनाधिकृतरित्या मध्यप्रदेश, गुजरात, आदी राज्यातून येणारे कापसाचे बी बियाणे आदीसह विनापरवाना बियाणे अवैधरित्या विक्री करणाऱ्यांना चांगलाच धसका बसला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष लोले करीत आहेत.