धुळे - जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या अक्कलपाडा धरणातील पाण्याचा पांझरा नदी पात्रात विसर्ग करण्यात आल्याने या पुराचा फटका साक्री आणि पिंपळनेर गावाला बसला आहे. गावातील अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
साक्री शहरातून वाहणाऱ्या कान नदीच्या पुराचे पाणी तिरंगा नगर आणि नवकार नगरमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिंपळनेर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली असून पुलावरून दोन्ही बाजूंनी अडकलेल्या नागरिकांना समुहा समुहाने मार्गस्थ करण्यात आले आहे. नदीच्या दोन्ही बाजुने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पिंपळनेरकडे जाणारी वाहने अखेर बंद करण्यात आले आहेत.
कासारे गावाच्या तिन्ही पुलावरून पाणी वाहत असून साक्रिशी संपर्क तुटला आहे. साक्री येथील कान नदीवरील पुलावरही पुराचे पाणी चढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कासारे बाजारपेठेत तिसऱ्यांदा पाणी आले. यावेळी दीड मीटर पाणी अधिक,असून सर्व दुकाने पाण्याखाली गेली आहेत. ग्रामपंचायत कार्यालायशेजारील गाव दरवाजाला पाणी लागले आहे. सर्व बाजार ओटे दृष्टीआड झाले आहेत. यापूर्वीचे पुराचे सर्व विक्रम यंदाच्या पुराने मोडले आहेत.
या पुराची आमदार डी. एस. अहिरे, साक्रिचे तहसीलदार संदीप भोसले, साक्रीचे पीआय ढुमणे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.