धुळे - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारावर मात करण्यासाठी धुळ्यातील एका खासगी रुग्णालयातील डॉ. यतीन वाघ यांनी अनोखा प्रयोग करीत पीपीई किट आपल्या रुग्णालयातच तयार केली आहे. याच किटचा वापर करून ते रुग्ण सेवा करत आहेत.
सध्या कोविड -19 या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता शासन पातळीवर टप्याटप्याने शासकीय रुग्णालयात पीपीई किट पुरविण्यात येत आहेत. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये अद्याप किट उपलब्ध नाही. त्याठिकाणी रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्याही आरोग्यची तेवढीच काळजी घेणे आवश्यक आहे. या अडचणीतून मार्ग काढला आहे तो, यतीन वाघ या धुळ्यातील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी. डॉ. वाघ यांनी कोविड-19पासून रुग्णालयात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक पुठ्ठ्याचा बॉक्स, एक प्लास्टिक शीट, कॉटन टेप, दोन लेसचा वापर करून अवघ्या १०० रुपयांत पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेन्ट) किट तयार केले आहे.
डॉ. वाघ यांनी तयार केलेला हूड आणि त्याखाली ओटी (ऑपरेशन थिएटर) गाऊन वापरून सुरक्षित पीपीई किट तयार केली आहे. विशेष म्हणजे डॉ. वाघ यांनी तयार केलेले हूड निर्जंतुक करून पुन्हा वापरता येणार आहे. त्यांनी रुग्णालयात या किटचा वापरही सुरू केला आहे. डॉ. वाघ यांनी तयार केलेले हूड हे अन्य हूडपेक्षा हवेशीर आहे. या पीपीई किटद्वारे खासगी रुग्णालये सहजतेने सुरक्षितपणे सुरू होऊ शकतात.