धुळे - पैसे उसनवारीच्या वादातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून झाल्याची घटना धुळे शहरातील कुमारनगर भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आणि मारेकरी यांच्यावर काही गुन्हा दाखल आहेत. या खूनाचे नेमके कारण पैसे उसनवारीचेच आहे, की अन्य कारण आहे ? याचा देखील तपास पोलीस करत आहे.
पैशाच्या वादातून हल्ला - या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्टच्या मध्यरात्री धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणार चंदन ऊर्फ चिन्नू राजेंद्र पोपली याच्या घराजवळील चौकात भटू चौधरी, यासीन पठाण तसेच भटू चौधरी याचा ड्रायव्हर नाव माहित नाही. अश्या तिघांनी दुचाकीवर येऊन उसनवारीच्या पैशाच्या वादातून चंदन ऊर्फ चिन्नू राजेंद्र पोपली याच्याशी वाद घालत, त्याला शिवीगाळ करून झटापट करून भटू चौधरी आणि त्याचा ड्रायव्हर अशा दोघांनी त्याला पकडून ठेवून यासीन पठाण याने गावठी कट्टयाने चिन्नूला मारण्याच्या उद्देशानं त्याच्या दिशेनं गोळी झाडली.
पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल - यात चिन्नूच्या छातीवर डाव्या बाजूस लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मयत चंदन ऊर्फ चिन्नू राजेंद्र पोपली याचा मित्र पवन जितेंद्र गुडीवाल याच्या फिर्यादीनुसार भटू चौधरी, यासीन पठाण, तसेच भटू चौधरी याचा ड्रायव्हर अश्या तिघांविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटू चौधरी आणि गावठी कट्टयाने फायरिंग करणारा यासीन पठाण अश्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास एपीआय पाटील करत आहेत.