धुळे - जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभाराची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरधाने तालुक्यातील जापी येथील मृत व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एस. टी. महामंडळाचे कर्मचारी असलेले रवींद्र दिलीप ठाकरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तब्बल ४८ तास प्रशासनाने हा मृतदेह आपल्याच ताब्यात ठेवला. मृत रवींद्र ठाकरे यांचा अहवालही निगेटिव्ह आला. पण, मधल्या वेळेत प्रशासनाकडून मृतदेहाची हेळसांड करण्यात आली, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
यापेक्षाही दुर्दैवी आणि दुःखद बाब म्हणजे तब्बल ४८ तासानंतर जेव्हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला, त्यावेळी प्रशासनाकडून त्यांना दुसर्याच एका व्यक्तीचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. धुळे आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर मृत व्यक्तींचे नातेवाईक आणि समाजातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. तर जापी गावात दुसराच मृतदेह आल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
एकीकडे केंद्र सरकार आणि सैन्य दलाकडून आरोग्य कर्मचारी आणि कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला जात असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा बेजबाबदार आणि गलथान कारभार उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीच्या मृतदेहाऐवजी दुसर्याच व्यक्तीचा मृतदेह देण्याची धक्कादायक चूक धुळे आरोग्य विभागाकडून घडली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग झोपेत काम करतो आहे का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - धुळे जिल्ह्यात पुन्हा दोन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या 30 वर