धुळे - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मंगळवारी रात्री उशिरा धुळ्यात पोहोचले. त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक त्याचबरोबर आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी धुळे जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील आढावा घेतला.
जे परप्रांतीय नागरिक लॉकडाऊनमुळे इतर ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठीदेखील लवकरात लवकर निर्णय जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्याच्या सीमांवरील गस्त आणखी वाढवावी, असे निर्देश अनिल देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. सध्या कोरोनासंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. त्या रोखण्यासाठी वेबसाईटवर कोरोनासंदर्भातील सर्व माहिती देण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
कोरोनाच्या काळात अन्नधान्याची साठवणूक करून काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच कोरोनाच्या लढाईमध्ये सगळ्यांनीच पोलीस, आरोग्य कर्मचारी तसेच सफाई कामगारांना सहकार्त करावे, असे आवाहान अनिल देशमुख यांनी नागरिकांना केले.