धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमसिंथ प्रा.लि. या रसायन उत्पादक कारखान्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक जण जखमी झाले होते.
हेही वाचा - शिरपूर स्फोट प्रकरण : दुर्घटनेची जबाबदारी कंपनीने घेतली - संजय वाघ
अटक केलेल्या संशयितांमध्ये कारखान्याचे संचालक संजय बाबुराव वाघ (62, रा.नाशिक), साईट इंचार्ज गणेश भानुदास वाघ (36, रा.अमळनेर) आणि जनरल मॅनेजर अनिल केशव महाजन (52, बऱ्हाणपूर, सध्या रा.शिरपूर) यांचा समावेश आहे.
हेही वाचा - धुळे दुर्घटना : पाहा स्फोट झालेल्या कंपनीच्या परिसरातील CCTV दृश्य
रुमित केमिसिंथ कारखान्यात 31 ऑगस्टला रिऍक्टरचा स्फोट झाल्याने 14 कामगार ठार तर 70 जण जखमी झाले होते. यानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या दिवसानंतर संशयित फरार होते. आज संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले. सकाळी त्यांची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.