चंद्रपूर- चंद्रपूर परिमंडळातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रांतर्गत कळमना येथील सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेत वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. बल्लारपूरच्या वनाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार परिसरात गस्त घालत असलेल्या स्थानिक वनरक्षकाला कुकुडेरंजी झुडपाजवळ कंपार्टमेंट क्रमांक-572 मध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वाघिणीचा मृतदेह संक्रमण उपचार केंद्रात हलवण्यात आला आहे. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृत्यूचे कारण कळेल, असे वनविभागाने म्हटले आहे.
राज्यात वाघांच्या शिकारीची टोळी कार्यरत- महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह हरियाणा, तेलंगाणा ते आसामपर्यंत वाघाची शिकार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नुकतेच पर्दाफाश झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाघाची शिकार केल्याच्या प्रकरणी आसामच्या गुवाहाटी वनविभागाने बावरीया टोळीच्या तिघांना वाघाच्या कातडीसह अटक केली होती. तर 16 जणांची वनविभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. या टोळीतील काही सदस्य चंद्रपूर, गडचिरोली वनक्षेत्रात असल्याची माहिती आरोपींनी दिल्यानंतर वनविभाग सतर्क झाले आहे.
वाघिणीचे वय चार वर्षे आहे. तिचे अवयव शाबूत आहेत- पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार ( ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर), चंद्रपूर )
वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान- चंद्रपूर, गडचिरोली वन पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी येथून बावरीया टोळीतील सोळा सदस्यांना ताब्यात घेत वाघाचे पंजे, नख, शस्त्र आणि 46 हजार रुपये जप्त केले आहेत. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने देशातील सर्व प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवतालच्या क्षेत्रांत वाघांच्या शिकारीची शक्यता असल्याची सूचना केली आहे. जगभरातील सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाघाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधींची तरतूद व उपाययोजना करण्यात येतात.
महाराष्ट्रात सरासरी आहेत 444 वाघ- देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये प्रोजेक्ट टायगरची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्टेटस ऑफ टायगर्स 2022 म्हणजे देशातील वाघांची अधिकृत संख्या जाहीर केली होती. या आकडेवारीनुसार देशात किमान 3167 वाघ आहेत. तर देशात कमाल 3925 वाघ आहेत. तर देशातील वाघांची सरासरी संख्या 3,682 आहे. गेल्या चार वर्षात वाघांची संख्या 50 टक्क्यांनी वाढल्याचा सरकारचा दावा आहे. देशात सर्वाधिक वाघांची संख्या (785) मध्य प्रदेशात आहे. त्यानंतर कर्नाटक (563), उत्तराखंड (560) आणि महाराष्ट्र (444) अशी वाघांची संख्या आहेत.
हेही वाचा-