चंद्रपूर- गावातील झोपडीत शिरलेला वाघ तब्बल सहा तासांच्या नाट्यानंतर अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नाने या वाघाला सुरक्षितरित्या पकडण्यात आले.
झोपडीत शिरलेला वाघ अखेर जेरबंद... नागभीड तालुका हा जंगलाने वेढला असल्याने येथे हिंस्र प्राण्यांचा वावर दिसून येतो. हे प्राणी अनेकदा गावातही शिरकाव करतात. याच प्रकारची पुनरावृत्ती रविवारी झाली. नागभीड तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणी गावात एक पट्टेदार वाघ चक्क झोपडीत दिसून आला. श्रीकांत देशमुख यांच्या झोपडीत हा वाघ दडून बसला होता. त्यांना ही बाब लक्षात आल्यावर धक्काच बसला. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत गावकऱ्यांनी वाघाला बघण्यासाठी एकच गर्दी केली. यादरम्यान मनोहर पाल नावाच्या व्यक्तीला वाघाने जखमी केले.
याची माहिती वनविभागाला लागली. वनविभागाचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. वाघाला पकडण्याची मोहीम सुरू झाली. मात्र, वाघ चकवा देत होता. तब्बल सहा तास हा लपंडाव चालला. अखेर वाघाला डार्ट मारुन बेशुद्ध करण्यात आले. आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.