चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील सोमणपली नाल्यात आज पुन्हा एकदा पंधरा जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. रविवारी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे मागील दहा दिवसात पुरात वाहून गेलेल्या जनावरांचा आकडा पन्नासावर गेला आहे.
सोमणपल्ली-कोढांणा मार्गावर मोठा नाला आहे. या नाल्यावरील पुल दहा वर्षापासून क्षतिग्रत आहे. सोमणपल्ली येथिल शेतकऱ्यांची शेती कोंढाणा परिसरात आहे. त्यामुळे त्यांना जनावरे घेवून नाल्यातील पुरातून मार्ग काढीत जावे लागते. दरम्यान, रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नाला दूथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, जनावरांचा कळप नाल्यातील पाण्यात उतरला. यावेळी पंधरा जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. यामुळे आठवडाभरात पुरात वाहून गेलेल्या जनावरांचा आकडा पन्नासावर गेला असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.