चंद्रपूर - दहा वर्षीय मुलीला मलेरिया झाल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याऐवजी घरी पाठविण्यात आले. आज प्रकृती खालावल्याने अखेर या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
राजुरा तालुक्यातील मौजे अन्नूर या गावातील चौथीत शिकणारी मुलगी आरती रमेश येलाम हिची तब्येत बिघडली. त्यामुळे तिला बुधवारी (दि. 8 एप्रिल) चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी तिच्या रक्ताची तपासणी केली असता मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. या गावात मलेरियाची साथ असल्याची माहिती आहे. अशावेळी डॉक्टरने तिला भरती करून उपचार करणे गरजे होते. मात्र, डॉक्टरने हलगर्जीपणा दाखवत तिला घरी पाठविल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
आज सकाळी या मुलीची प्रकृती गंभीर झाली. तिला राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे या दहा वर्षीय मुलीचा नाहक जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिक करीत आहेत.
हेही वाचा - तुकडोजी महाराजांच्या शैलीत कोरोनावर भजन, छोटूलालने केली जनजागृती