चंद्रपूर - शिक्षणासाठी दिल्लीत गेलेले राज्यातील विद्यार्थी तिथे अडकून पडलेले आहेत. यासाठी राज्य सरकारचे पूर्ण नियोजन झाले असून त्यांना रेल्वेने परत आणण्यात येणार आहे. मात्र, यासाठी केजरीवाल सरकारने अद्याप मंजुरी दिली नाही. ती मिळताच हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतणार, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे राज्यातून दिल्लीत गेलेले जवळपास एक हजार 400 विद्यार्थी तिथे अडकून पडले आहे. यामध्ये सारथी, बार्टी, अन्य विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांना ऑनलाईन लिंक तयार करण्याची सूचना करण्यात आली होती. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली आहे. या विद्यार्थ्यांना रेल्वेने राज्यात आणायचा निर्णय झाला आहे. लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून सविस्तर माहिती मिळेल. त्यानंतर संबंधित रेल्वेचे वेळापत्रकही हाती येईल. हे विद्यार्थी राज्याच्या कानाकोपऱ्यातील असून दिल्ली-नागपूर-मुंबईमार्गे ही रेल्वे यावी. यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, यासाठी दिल्ली सरकारच्या संमतीची प्रतीक्षा आहे. ती मिळताच तातडीने या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणणे सुरू होईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.हेही वाचा - कोरपना तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या