राजुरा (चंद्रपूर) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचललेली आहेत. मास्क न लावता फिरणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने राजुरा नगरपालिकेने 24 एप्रिलला नगराध्यक्ष अरुण धोटे व मुख्याधिकारी जुही अशिया यांच्या मार्गदर्शनात शहरात धडक कारवाई केली. यात 65 नागरिकांवर कारवाई करण्यात आली व यांच्याकडून 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच त्यांना मास्क देण्यात आले.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत. देशात लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झालेला आहे. जिल्हा व राज्याच्या सीमा सील आहेत. प्रशासनातील अधिकारी नागरिकांना जागृत करण्यासाठी वारंवार सूचना देत आहेत. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या त्रासदायक ठरत आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे केलेले आहे. मास्क न लावता फिरणार्या लोकांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत.
24 एप्रिलला राजुरा शहरात नगरपालिकेने धडक मोहीम राबवली. यात स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी, विजय जांभुळकर, वीरेंद्र धोटे, पुणेकर, कापणे, भोई, व इतर कर्मचारी यांच्या तीन पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली व तेरा हजाराचा दंड वसूल केला. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे. तोंडावर मास्क बांधावा. सोशल डिस्टन्स चे नियम पाळावेत. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावेत व सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी जुही अर्शिया यांनी केले आहे.