चंद्रपूर - कोरोनाचा प्रसार सर्वत्र वाढतच आहे. ग्रामीण भागातही याचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी वेबफोरोस कंपनीने तयार केलेले De-Live-R ॲप जिल्हा प्रशासन लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने वेबफोरोस कंपनीचे यासंदर्भात परस्पर सामंजस्य करार केला आहे. De-Live-R हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. लॉकडाऊच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहे. परंतु बाहेर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. हा संसर्ग होऊ नये व नागरिकांना वेळेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच व्हावा, त्यावर नियंत्रण असावे, कोणाची फसवणूक होऊ नये, तसेच नागरिकांचा यामध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी या ॲपची मदत होणार आहे. सुरुवातीला सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात होणार आहे. ही सेवा सर्वांसाठी मोफत आहे. याचा गैरवापर किंवा कोणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अॅपची ही आहेत वैशिष्ट्ये -
या ॲपवर ग्राहक आणि संबंधित दुकानदार या दोघांनीही आपली नोंदणी करणे आवश्यक आहे किराणा किंवा तत्सम खरेदीसाठी ज्या पद्धतीने चिट्ठी बनवली जाते त्याच पद्धतीने सोप्या भाषेत हे ॲप सामान्य नागरिकाला देखील वापरता येणार आहे. यासाठी स्थानिक भाषेतील अनेक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकाला त्याचा मालक घरी प्राप्त झाल्यानंतरच खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे द्यायचे आहे. हा ॲप कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आल्यामुळे ग्राहक दुकानदार आणि घरपोच वस्तू पोहोचवून देणाऱ्या व्यवस्थेतील प्रत्येकाच्या संपर्काची सूची देखील प्रशासनाला उपलब्ध होणार आहे, त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव झाल्यास लगेच उपाययोजना करणे प्रशासनाला सोपे होणार आहे.
किराणा, भाजीपाला, मेडिकल, डेअरी बेकरी, अंडी, चिकन, मटन, वॉटर कॅन आदी काही प्राथमिक विभागणी या ॲपमध्ये करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग होत असून या संदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व वेबफोरस या कंपनीचे संचालक मोहित चुग, निखिल शेंडे, प्रीतम भीरूड यांच्यात सामंजस्य करार झाला.