चिमूर (चंद्रपूर) - तालुक्यातील सावरी (बीड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना प्रसुती झाल्यानंतर मानव विकास योजनेंतर्गत प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत मंजूर झाली आहे. मात्र, तीन वर्षांचा कालावधी होऊनही १९६ महिला या आर्थिक मदतीपासून अजूनही वंचित आहेत.
प्राथमिक आरोग्य केद्र सावरी अंतर्गत येणाऱ्या ४२ गावांतील १९६ गरोदर महिलांची मानव विकास योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यतेसाठी निवड करण्यात आली होती. या महिलांना अडीच वर्षांचा कालावधी होऊनही लाभ मिळाला नव्हता. या दिरंगाई बद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक गजानन उमरे यांनी २२ जानेवारीला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात आली.
या योजनेच्या वाटपात आर्थिक गैर व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने १७ फेेब्रुवारीला शेगाव पोलीस ठाण्यात सेवानिवृत डॉ. खारोडे व लिपीक फाले यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, या योजनेच्या पात्र महिलांना त्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यतेपासून तीन वर्षांचा कालावधी होऊनही वंचितच ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात मजुरांना काम नसल्याने आर्थिक चणचण भासत आहे. अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ मिळाल्यास लाभार्थ्यांना आर्थिक हातभार लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देऊन आम्हाला लाभ मिळवून दयावा, अशी मागणी लाभार्थी महिला करीत आहेत.