चंद्रपूर - माजी मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस आपल्या घरी असताना अचानक त्यांचा फोन खणखणला. समोरुन आपण पंतप्रधान कार्यालयातून बोलत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्याशी बोलू इच्छितात असे सांगण्यात आले. त्यानंतर काही क्षणातच नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. शोभा फडणवीस या माजी मंत्री असून त्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत.
शुक्रवारी त्यांना अचानक पंतप्रधान मोदींचा फोन आला. माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यामुळे त्यांची प्रकृती कशी आहे, याची पंतप्रधान मोदींनी आस्थेने चौकशी केली. फडणवीस यांनी आमच्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे अत्यंत स्तुत्य काम करत असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले. हे ऐकून पंतप्रधानांनी देखील समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे सुरुवातीला मोदींनी मराठीतच संवाद साधला.
फडणवीस यांनी कोरोनाचे संकट टळल्यावर पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर मोदींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना आमंत्रित केले. आपण कधी मला भेटायला आलाच नाहीत, मी तर देवेंद्र फडणवीस यांना कितीदा म्हणालो, अशी गोड तक्रार देखील त्यांनी केली. या एकूणच संवादाने शोभा फडणवीस सद्गदित झाल्या. त्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.