चंद्रपूर : नदीपात्रातील धारीवालच्या फ्लोटींग स्ट्रक्चरला परवानगी नाही. त्यांच्याकडून अवैधरित्या पाण्याची उचल केली जात आहे, असा अहवाल पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. मात्र, पाण्याची अवैध उचल प्रशासनाने अद्याप थांबविली नाही. धारिवाल इंफ्रा. या कंपनीचा ताडाळी एमआयडीसी परिसरात वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी वर्धानदीतून पाणी घेतल्या जाते. यासाठी धारिवालने नदीपात्रात इनटेक वेल तयार केली आहे.
पाणी उचल करण्याची २०२६ पर्यंत परवानगी : इनटेक वेलमध्ये पाणी घेण्यासाठी नदीपात्रात 'प्लोटींग स्ट्रक्चर' तयार केले आहे. त्याची परवानगी घेतलेली नाही. १५ डिसेंबर २०२२ रोजी यासंदर्भात तहसील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत धारीवालचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सय्यद आमीर यांनी प्लोटींग स्ट्रक्चरच्या माध्यमातून पाण्याची अवैध उचल धारीवाल यांच्याकडून केली जात आहे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
पाटबंधारे विभागाकडून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द : त्यानंतर प्रशासनाने याचा रितसर अहवाल पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाटबंधारे विभागाने हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात प्लोटींग स्ट्रक्चरच्या माध्यमातून ६० एच.पी.च्या चार पंपच्या सहाय्याने पाणी इनटेक वेलमध्ये टाकण्यासाठी वेगळी परवानगी घेतली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून पाण्याची अशा तऱ्हेने अवैद्य उचल सुरू आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाचे अधिकारी नियमित तपासणी करतात. त्यांच्या लक्षात ही बाब आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा प्रशासनाकडे दिवा अहवाल : प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करु, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शामसुंदर काळे यांनी सांगितले. मात्र धारीवाल संदर्भातील प्रशासनाची नरमाईची भूमिका बघता बैठकांच्या सत्रात हा विषय सुद्धा गुंडाळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गावकरी, शेतकरी पाण्यापासून वंचित : वढा या ठिकाणी धारिवाल कंपनीची पाणी उपसा यंत्रणा आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी धारीवाल कंपनीला परवानगी आहे. मात्र, नदी प्रवाहाच्या मधोमध हे फ्लोटिंग स्ट्रक्चर तयार करण्यात आले, यासाठी प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. जेव्हा उन्हाळ्यात नदीचे पात्र अरुंद होते अशावेळी आजूबाजूला गावांच्या पाणीपुरवठा योजनांना याचा फटका बसतो. अनेकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांना देखील सिंचनासाठी पाणी मिळत नाही. मात्र धारीवाल कंपनीने फ्लोटिंग स्ट्रक्चर तयार केले ज्यामुळे दुष्काळ जरी असला तरी वर्धा नदीतून पाण्याचा उपसा करता येतो.