चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथे माना आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे. ते स्वतःला नाग वंशीय मानतात. त्यामुळे त्यांच्या प्रथा, परंपरा व संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी नागदिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
माना जमातीच्या संस्कृती आणि परंपरेनुसार १ डिसेंबरपासून नागदिवाळी महोत्सव साजरा केला जातो. मुक्ताई देवस्थान, मुक्ताई टेकडी आणि डोमा येथे दरवर्षी १ डिसेंबरला हा उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर माना समाजाच्यावतीने आपआपल्या गावात नागदिवाळी उत्सव साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे पुयारदंड येथे नागदिवाळीच्या दोन दिवशीय कार्यक्रमाचे २५ आणि २६ डिसेंबरला आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी जमातीच्या विधीवत परंपरेनुसार माता मानका देवीच्या घटाची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला.
दोन दिवशीय कार्यक्रमामध्ये बालगोपालांचे सांस्कृतीक कार्यक्रम, भडजन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर समाज प्रबोधन करण्याच्या दृष्टीने माना जमातीचा इतिहास, संविधानीक अधिकार, विविध योजनांची माहिती, जात पडताळणी संबंधी अडचणी आणि त्यावरील उपाय याविषयीची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली. त्यानंतर भजने, गाणे, नृत्य, मानिका मातेचा जयघोष करीत दिव्यांची मिरवणूक काढत दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गावाला जत्रेचे स्वरुप आले होते. यामध्ये सर्व गावातील स्त्री-पुरुष, आबाल वृद्ध आणि तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता.