चंद्रपूर - आपल्या कारकिर्दीसाठी वादग्रस्त ठरलेले चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांच्याकडून ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे नुकतेच समोर आले. जे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाते. अशा लाभार्थी रुग्णांना नागपुरातुन वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्याचा सल्ला सोनारकर देतात. याबाबत पीडितांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली होती. आता याची दखल चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे. डॉ. सोनारकर विषयीच्या तक्रारी गंभीर असून वैद्यकीय विभागाने याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे आता वैद्यकीय विभाग यावर काय पाऊल उचलले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनारकर यांचा सुरुवातीपासूनचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिलेला आहे. ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे माजी आमदार नाना शामकुळे यांचे जावई आहेत. राज्यात भाजपाची सत्ता असताना डॉ. सोनारकर हे कुणालाही जुमानत नव्हते. आपलं कोणी काहीही वाकडं करू शकत नाहीत याच तोऱ्यात ते नेहमी वागायचे. आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील ते केराची टोपली दाखवायचे. त्यामुळे त्यांच्या या हेकेखोर स्वभावामुळे सारेच त्रस्त असायचे. सहकारी आणि हाताखालच्या कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देण्याच्य त्यांच्या अनेक तक्रारी झाल्या. एवढंच नव्हे तर महिला वैद्यकीय कामगारांचा लैंगिक छळ अशाप्रकारचे गंभीर आरोपही त्यांच्यावर झालेत. तशा तक्रारीही झाल्यात मात्र त्याचं पूढे काहीच झालं नाही. त्यामुळे सोनारकर यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. अजूनही त्यांचा हा तोरा कायम आहे.
कोरोनाच्या काळात कुणाचेही फोन न उचलणे, दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, उद्धटपणे प्रतिसाद देणे ह्यामुळे वैद्यकीय विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या ताणात आणखीनच भर पडली. डॉ. सोनारकर याच्या ढिसाळ कारभारामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात मोठा गोंधळ उडाला होता. हा वेळ गेल्यावर आता पुन्हा एका नव्या वादात डॉ. सोनारकर ह्यांचे नाव समोर आले. जिल्ह्यात हिंस्र प्राण्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी होतात, काहींचा जीव जातो तर काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा पीडित रुग्णांना चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये भरती केले जाते. मात्र, अजूनही येथे उपचार व्यवस्था नसल्याने त्यांना नागपूर येथे रेफर केले जाते. तिथून उपचार करून ते परत आल्यावर चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यास येतात. याच आधारावर त्यांना वनविभागाकडून एक ते पाच लाखांची नुकसानभरपाई मिळते. मात्र डॉ. सोनारकर हे त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात. तुम्ही नागपुरात उपचार घेतला मग तिथूनच प्रमाणपत्र घ्या असे म्हणून त्यांना परतवून लावतात.
एकतर ही लोक आधीच गरीब जखमी लोकांचे नातेवाईक कसेबसे नागपुरात जातात आणि राहतात. त्यातही अपंगत्व येण्याचे दुःख वेगळे. असे असताना डॉ. सोनारकर त्यांना परत नागपुरात जायला सांगतात. वास्तवीक असा कुठलाही नियम नाही. जो जखमी व्यक्ती ज्या जिल्ह्याचा त्याच शासकीय रुग्णालयातुन वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. मात्र, आपल्या मनमानी कारभाराने सोनारकर या नियमाला केराची टोपली दाखवतात. याबाबत एक पीडित सुरेश खिराटकर ह्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे ह्यांची भेट घेऊन या नियमाबाबत विचारणा केली असता असा कुठलाही नियम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच डॉ. सोनारकर ह्यांना पीडित व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. मात्र, सोनारकर ह्यांनी पीडिताला म्हटले की मी अशी मेख मारेल की तुम्हाला या वैद्यकीय प्रमाणपत्राचा कुठलाही लाभ होणार नाही असे म्हटले असा आरोप पीडिताने आयोजत पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे ह्या रुग्णाला अजूनही वनविभागाकडून मोबदला मिळाला नाही.
संपूर्ण प्रकरणाची दाखल चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी घेतली आहे. डॉ. सोनारकर ह्यांचे अनेक तक्रारी सातत्याने येत असतात. ग्रामीण भागातील लाभार्थी लोकांची अशी हेळसांड योग्य नव्हे. ह्याबद्दल वैद्यकीय विभागाने ह्याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोरगेवार ह्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली. त्यामुळे ह्यावर आता वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.