राजूरा (चंद्रपूर) - जिल्ह्याची ओळख येथील वाघांनी सातासमुद्रापार करून दिली. जगभरातून वाघांना बघण्यासाठी पर्यटक चंद्रपूरात दाखल होतात. जिल्ह्याच्या सन्मानात भर घालणारी ही बाब असली तरी दूसरी बाजू मात्र भयावह आहे. जिल्ह्यातील शेकडो स्त्रियांना या वाघांच्या हल्ल्यांमुळे वैधव्य आले आहे. शासनाकडून मदतीची रक्कम मिळाली खरी; मात्र, कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. वाघ विधवांची ससेहोलपट सुरू आहे. राजुरा तालुक्यात दहा बळी घेणाऱ्या आरटी वन वाघामुळे वैधव्य आलेल्या स्त्रियांचा प्रश्न अधिकच गंभीरतेने पुढे आला आहे.
वाघ ही चंद्रपूर जिल्ह्याची खरी ओळख. ताडोबा वाघ्र प्रकल्पातील वाघांनी जगाला भुरळ घातली आहे. येथील वाघांचा करामतींनी जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक ताडोबातील वाघ बघण्यासाठी येतात. ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या लक्षणीय आहे. येथील खुल्या वनक्षेत्रात वाघ मोठ्या संख्येने आढळतात. जिल्ह्यासाठी ही बाब भूषणावह आहे. आपल्या वनक्षेत्रात ज्या जिल्ह्याने वाघांना सांभाळले, त्यांचे संवर्धन केले, आता वाघ त्याच जिल्ह्यातील माणसांच्या जिवावर उठले आहेत.
हेही वाचा - शेततळ्यातील पाणी तात्काळ कमी करा; सोलापूर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
जिल्ह्यात मानव-वाघ संघर्षाने टोक गाठले आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी काही वाघांना गोळी झाडून ठार करण्याची दुर्दैवी वेळ वनविभागावर ओढवली होती. राजुरा तालुक्यात धूमाकूळ घालणाऱ्या आरटी वन वाघाने आतापर्यंत दहा बळी घेतले आहेत. बळी गेलेल्यांत शेतकरी, शेतमजूर, वनमजूर आणि सरपण गोळ्या करणाऱ्या गरीब लोकांचा समावेश आहे. या वाघांनी घरच्या कर्त्या पुरुषांना भक्ष्य केल्याने कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. या वाघांना ठार करण्याची मागणी आता पुढे येवू लागली आहे. राजूरा, गोंडपिपरी वनक्षेत्रातून वाघांचा भ्रमणमार्ग गेला आहे. वाघांच्या अधिवासासाठी येथील वनक्षेत्र उपयुक्त असल्याने येथे वाघांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील शेती जंगलालगत आहे. शिवाय, अनेक गरजा वनांवर अवलंबून असल्याने वनात लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे येथे मानव-वाघ संघर्षाने टोक गाठले आहे.
राजुरा, गोंडपिपरी तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील शेकडो स्त्रियांना वाघांच्या हल्ल्यांमुळे वैधव्य आले आहे. कुटुंबाचा भार पेलण्याची मोठी जबाबदारी स्त्रियांवर ओढवली. वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला शासनाकडून आठ ते दहा लाख रुपयांची मदत दिली जाते. या पैशांतून कुटुंबाचे काही प्रश्न नक्कीच सुटतात. मात्र, कुटुंबाला मानसिक आधार देताना, मुलांना घडवताना स्त्रियांना मोठेच कष्ट उपसावे लागत आहेत. वाघाच्या हल्ल्यांमुळे वैधव्य आलेल्या स्त्रियांना शासनाचा इतर योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पेलताना अनेक वाघ विधवांना दुःखाचे डोंगर उरावर घेऊन जगावे लागत आहे. वाघ बघण्यासाठी आलेल्या पर्टकांमुळे शासनाच्या तिजोरीत भर पडत आहे. दुसरीकडे वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाची वाताहत सुरू आहे. ही जिल्ह्यांसाठी मोठीच शोकांतिका ठरत आहे.
हेही वाचा - मुंबईत विजेच्या कडकडासह पाऊस; अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज