चंद्रपूर - लॉकडाऊनमुळे सर्वाधिक हाल हे गोरगरीब मजुरांचे होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना तर दोन वेळचे जेवण मिळणे देखील दुरापस्त झाले आहे. भिसी येथे राहणाऱ्या एका ७० वर्षीय महिला अनुसया माट्टेटवार आणि त्यांची दोन मुले, एक अपंग मुलगी लॉकडाऊनमुळे दोन दिवसांपासुन उपाशी होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराजवळच्या उकीरड्यावर टाकलेले शिळे अन्न खाल्ले होते. डोकं सुन्न करणारा प्रसंग एका नागरिकाने पाहिला आणि इतर नागरिकांच्या मदतीने त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली.
हेही वाचा... Video : अशी ही मदत ! मी आर्थिक मदत करू शकत नाही, पण दोन एकरातील केळी गरजूंना देतो
भिसी अप्पर तालुक्यातील अनुसया माट्टेटवार हि ७० वर्षीय वृद्ध महिला आपल्या दोन मुले आणि एका मुलीसोबत झोपडीत राहते. या वृद्धेचा एक मुलगा गतीमंद असल्याने कोणतेही काम करत नाही. तर दुसरा मुलगा हॉटेलमध्ये अत्यल्प रोजावर काम करतो. मुलगी देखील अपंग आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलावरच कुटुंबाची जबाबदारी होती. मात्र, लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद झाले आणि काही दिवस घरी असलेल्या शिधासामुग्रीवर या सर्वांनी गुजराण केली. मात्र, त्यानंतर त्यांच्या जेवणाचे हाल होऊ लागले. दोन दिवस हे कुटुंब उपाशी होते. रविवारी घरापासुन काही अंतरावर राहणाऱ्या एका महिलेने उकीरडयावर शिळे अन्न टाकले होते. दोन दिवसांपासुन भुकेलेल्या या सर्व सदस्यांनी तेच अन्न आपापसात वाटून खाल्ले.
हा सर्व प्रसंग तिथे असणाऱ्या अफरोज पठाण याने पाहिला आणी याची माहिती किराणा दुकानदार मनोज डोंगरे यांना दिली. यानंतर अफरोज पठाण, मनोज डोंगरे, अंकुश धांडे, अनंता खापर्डे, राहुल बन्सोड या सर्व नागरिकांनी आपआपल्या परीने तांदुळ, किराणा, भाजीपाला, धान्याचे पीठ गोळा करुन ते अनुसया माट्टेटवार यांच्या परीवाराला दिले. या नागिरकांच्या मदतीने काही दिवसांपुरता का होईना पण या कुटुंबाच्या पोटपाण्याचा प्रश्न सुटला आहे.