चंद्रपूर - आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यता असली की मोठी संकटेही नतमस्तक होऊन जातात. याचे उत्तम उदाहरण ठरलाय राजुरा शहरातील सादिक बंदेअली हा विद्यार्थी. शारीरिक अपंगाला न जुमानता त्याने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावी गाठली. एवढेच नाही तर वर्गातील हुशार विद्यार्थी अशी आपली ओळख निर्माण केली. भविष्यात सीए होण्याचे स्वप्न त्याने आपल्या उराशी बाळगले आहे.
सादिक लहाणपणापासूनच अपंग आहे. हातपाय जरी निकामी असले तरी त्याचा आत्मविश्वास दांडगा आहे. अपंगत्वाने खचून न जाता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी तो सज्ज आहे. शिक्षणाच्या या साधनेत त्याचे कुटुंबीय खंबीरपणे त्याच्यासाठी उभे आहेत. त्याचे पालक त्याला रोज शाळेत पोहोचवून देतात.
हेही वाचा - माझ्या सुनेचे चार जणांसोबत विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाणांचा खळबळजनक आरोप
सध्या राज्यभरात इयत्ता दहावीची परीक्षा सुरू आहे. सादिकने अहोरात्र अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली आहे. कुणाचीही मदत न घेता अपंग हाताने तो हे सर्व पेपर सोडवित आहे. त्याचे हे अपंग हात सक्षम हातांना आदर्श घालून देत आहेत.