चंद्रपूर- सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना विहिरगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात वाघाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.
जिल्ह्यातील राजूरा (मध्य) चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या विहिरगाव बिटातील सर्व्हे नंबर ३३६ मध्ये चूनाळा गावातील उद्धव मारोती टेकाम हे सरपण गोळा करायला गेले. सरपण गोळा करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकाम यांचे शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. हल्ल्याची ही घटना शनिवारी सकाळी घडली.
वाघाला जेरबंद करा अन्यथा आंदोलन:
राजूरा तालुक्यात वाघाचा हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. नित्य होणारे व्याघ्रदर्शन, अधूनमधून होणाऱ्या हल्ल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे
माजी आमदार निमकरांनी केले सात्वन:
दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी आमदार तथा भाजप नेते सूदर्शन निमकर यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी या कुटुंबाचं सांत्वन केले आहे.