चंद्रपूर : अनैतिक संबंधांचा भांडाफोड होऊ नये म्हणून एका निष्ठुर मातेने नवजात अर्भकास बेवारस सोडले. या स्त्रीलिंगी अर्भकाचा भुकेमुळे मृत्यू झाला. ही घटना वरोरा शहरात उघडकीस आली असून पोलीस या निष्ठुर मातेचा शोध घेत आहेत.
ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करीत अर्भकास ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. अधिक माहितीनुसार शहरातील राजीव गांधी वार्ड, नवीन वस्ती येथील मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंतीजवळ असलेल्या खुल्या परिसरात काही मुले खेळत असताना त्यांना भिंतीच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात एक नवजात बाळ मृतावस्थेत आढळले. झाडाझुडपात नवजात अर्भक असल्याचे कळताच वार्डातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांना झाडाझुडूपांनी वेढलेल्या व कचरा असलेल्या ठिकाणी नवजात बाळ मृतावस्थेत आढळले. बाळाचा जन्म जवळपास १२ ते १६ तासांपूर्वी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. तसेच भुकेने अर्भकाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यामुळे एका अविवाहित युवतीने हे नवजात अर्भक फेकले असावे, अथवा मुलाची लालसा असणाऱ्या परिवाराने मुलगी नको म्हणून अर्भक फेकले असावे, असा कयास लावला जात आहे.
आजकाल मोठ्या प्रमाणात सिझर होत असताना ही प्रसूती दवाखान्यात झाली की घरी हा सुद्धा तपासाचा मुद्दा ठरु शकतो. या घटनेमध्ये अन्य प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश तर नाही ना? असाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सखोल तपासास सुरूवात केली असून नेमके हे कृत्य कोणी केले असेल याचा वरोरा पोलीस शोध घेत आहेत. नवजात अर्भकाला रात्रीच्या सुमारास झुडपात फेकून पोबारा करणारी ती अनोळखी माता कोण? यावर वरोरा शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.