चंद्रपूर - विमा कंपनीच्या नावाने सामान्य नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका टोळक्याचा चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेश येथून चालणाऱ्या या टोळक्याच्या महत्त्वाच्या आरोपींना अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. चंद्रपूर पोलिसांची ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
आमच्या कंपनीला नफा झाला आहे, त्यामुळे यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दामदुपटीने पैसे मिळतील, असे आमिष दाखवून ही टोळी सामान्य लोकांना फसवत होती. यामध्ये बळी पडलेल्या नागरिकांकडून वेळोवेळी आर्थिक लूट केली जाते. उत्तर प्रदेशातील मेरठ येथून हे रॅकेट सुरु होते. यामध्ये मध्यप्रदेश, आसाम, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक सामान्य नागरिकांना कोट्यवधीचा गंडा घातला जात होता. मात्र, हे प्रकरण जानेवारी महिन्यात उघडकीस आले.
हेही वाचा -चंद्रपुरच्या महाकाली मंदिरातून ११ वर्षीय मुलगी बेपत्ता, विशेष पथकाद्वारे शोध सुरू
या प्रकरणी ज्यावेळेस चंद्रपुरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने आपली फसवणूक झाल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. तेव्हा हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी माहिती घेतली असता 2014 पासून तब्बल 47 लाख रुपयांचा गंडा यारा कॅटने या बनावट कंपनीने तक्रारदार व्यक्तीस घातला होता. या प्रकरणाचा तपासात चंद्रपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून तीन आरोपींना अटक केली आहे.
कुलदीप उर्फ राजकुमार वालिया उर्फ बनवारीलाल शर्मा, दीप सिंह उर्फ दिपू ओबेराय मनवर सिंह आणि अभय उर्फ रमण भोपाल सिंह अशी या तीन आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, मुजावर अली, संतोष पानघाटे, प्रशांत लारोकर, इम्रान शेख यांनी केली.
हेही वाचा - गरोदर माता आणि कर्मचाऱ्यांच्या पैशांची अफरातफर; डॉक्टर आणि लिपिकावर गुन्हा दाखल
या रॅकेटला पकडणारी चंद्रपूर पोलीस देशात पहिली
2014 पासून नागरिकांना गंडविण्याचे काम ही टोळी करत होती. मात्र, त्यावर कोणीही अद्याप कारवाई केली नव्हती. चंद्रपूर पोलीस या रॅकेटला पकडणारी पहिली पोलीस आहे. या माध्यमातून आता अन्य राज्यात या प्रकरणाचा तपास लावण्यात मोठी मदत मिळणार आहे.
एक महिना होते मागावर
जानेवारी महिन्यात तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार सायबर सेल आरोपींना पकडण्यास निघाले. मात्र, आरोपी पथकाला वारंवार गुंगारा देत होते. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मेरठ, अलिगढ, बुलदंशहर, गुडगाव अशा ठिकाणी पथकाला आरोपींचा सातत्याने पाठलाग करावा लागला. अखेर एक महिन्याच्या अथक परिश्रमाने तीन आरोपींना पकडण्यात पथकाला यश मिळाले.
मूल आणि वरोऱ्याशी तार
या आरोपींनी जिल्ह्यात आणखी काही जणांना गंडविले असल्याची दाट शक्यता आहे. मात्र, भीती आणि बदनामीपोटी कोणी तक्रार करायला पुढे येत नाही. मात्र, यात मूल आणि वरोरा येथे दाखल झालेल्या तक्रारीशी या रॅकेटचे तार मिळते जुळते आहेत. मूल येथे 34 लाख तर वरोरा येथे 16 लाखांचा अश्याच प्रकारे गंडा घालण्यात आला. याचा तपास जिल्हा पोलिस करीत आहेत.