चंद्रपूर - दारू विक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कंजर मोहल्ल्यात आज स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत दारूने भरलेली चार चाकी वाहन (स्कॉर्पिओ गाडी) जप्त केली. वाहनाच्या किंमतीसह 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई मानली जात आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकाकडून कंजर मोहल्याकडे एक चार चाकी वाहन देशी आणि विदेशी पेट्यांनी भरलेला माल घेवून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार कारवाई करीत हे वाहन पकडण्यात आले.
तपासणी केली असता, त्यात 50 पेट्या विदेशी तर 12 पेट्या देशी दारू आढळून आली. ही दारू विष्णू कंजर या आरोपीची असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळातून आरोपी आणि चालक फरार झाला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्यात दारुबंदी आहे त्यातही सध्या कोरोनामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. असे असताना ही दारू जिल्ह्यात पोचतेच कशी हा खरा प्रश्न आहे. आता तर दारू गल्लोगल्ली मिळू लागली आहे. यावर कुणाचा वरदहस्त आहे याचाही शोध घेणे गरजेचे आहे.