चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदी केवळ कागदावर असल्याचे बोलले जाते. याचे प्रत्यक्ष उदाहरण काल(बुधवारी) पहायला मिळाले. चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणारा सात वाहनांतील देशी दारूचा साठा पकडला. ही कारवाई करत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर आमदारांना दारू तस्करीची माहिती असते, तर पोलीसांची गुप्त माहिती यंत्रणा काय करते? पोलिसांच्या आशीर्वादाने ही दारू तस्करी सुरू आहे का? असा प्रश्न देखील आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला.
अशी केली कारवाई -
बुधवारी रात्री शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुप्त माहितीच्या आधारावर पाळत ठेवली. अवैध दारू वाहतूक करणारी वाहने पकडून त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील दारूबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावली आहे, हे कालच्या घटनेतून समोर आले. आमदारांनी पकडलेला एकूण मुद्देमाल कोट्यवधी रुपयांचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलडाणा पासिंगची ही वाहने शेकडो पोलीस ठाणी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नाकेबंदी चुकवून जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहचल्याने चंद्रपूर पोलीस दलाच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी सध्या पडोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेतील सात वाहक-चालकांना वाहनासह ताब्यात घेतले गेले आहे. यावेळी पडोली पोलीस स्टेशनमध्ये आमदार जोरगेवार व त्यांच्या समर्थकांसह शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे उपस्थित होते.
दारू तस्करीसाठी घेतली जाते विशेष काळजी -
जिल्ह्यात दारू आणण्यासाठी तस्करांनी स्वत:ची विशेष यंत्रणाच उभी केली आहे. मोठ्या प्रमाणात दारू आणायची असल्यास समोर पाहणी करण्यासाठी एक गाडी असते. ती आजूबाजूची सर्व स्थिती बघून पुढे जाते. ही गाडी बघून मागच्या दारूने भरलेल्या गाड्या प्रवास करतात. काही संशयास्पद असल्यास या मागच्या गाड्या अन्य मार्गाने पळून जातात.