चंद्रपूर : राजूरा क्षेत्रात कोळसा तस्करीच्या वादातून अंधाधुंद गोळीबारीची घटना घडली आहे. गोळीबारीची ही घटना काल रात्री घडली असून यात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर लल्ली शेरगिल नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सचिन डोहे, असे भाजपा नेत्याचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नीचे पूर्वशा सचिन डोहे, असे नाव आहे. यापूर्वी देखील कोळशाच्या वादातून यादव नामक व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. आता काही वर्षांनी अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
गोळीबाराची घटना : मिळलेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातील सोमनाथपूर वार्डमधील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे राहतात. सचिन डोहे यांच्या शेजारी लल्ली शेरगिल राहतो. काल रात्रीच्या सुमारास लल्ली घरात बाहेर जात असताना पाळत ठेऊन असणाऱ्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. गोळीबारातून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात लल्ली पळत जाऊन डोहे यांच्या घराच्या आवारात शिरला. यावेळी सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहे या बाहेर होत्या. मारेकऱ्यांच्या अंधाधुंद गोळीबारात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्या. लल्लीदेखील या गोळीबारात गंभीर जखमी झाला. लल्लीला गोळ्या लागल्याचे दिसल्यानंतर मारेकरी दुचाकीने फरार झाले.
आरोपी कोण आहेत? गोळीबारात जखमी झालेल्या पूर्वशा यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर लल्लीवर चंद्रपुरात उपचार सुरू असून त्याची स्थिती गंभीर आहे. हा हल्ला नेमका कोणी केला, त्यामागे कोणाचा हात आहे,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु हा गोळीबार कोळशाच्या वादातून झाला असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरुन गेला. आरोपींना पकडण्याचा मोठा दबाव पोलीस प्रशासनावर आला असून पोलीस प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. पोलिसांनी मध्यरात्रीच 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र आरोपींची नावे पोलीस प्रशासनाने उघड केलेली नाहीत.
पालकमंत्र्याचे आदेश : भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यामध्ये कोणीही अवैधरित्या शस्त्र बाळगल्यास त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घटनेच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देखील मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा-