चंद्रपूर - “स्वच्छ भारत मिशन" अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण 2020” मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये "चौथ्या" क्रमांकाचा पुरस्कार काल गुरुवारी ऑनलाईन 'स्वच्छ महोत्सव २०२०' समारंभात केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी जाहीर केला. सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या नागरी कार्य व गृहनिर्माण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.
चंद्रपूर महानगरपालिकेने आपल्या शहराचा स्वच्छता आलेख नेहमीच उंचावत नेला आहे. हीच परंपरा कायम राखत गतवर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2019' मध्ये देशातील २९ व्या क्रमांकाचे मानांकन यावर्षी उंचावत "स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये देशातील चौथ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे. हा पुरस्कार चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी एकात्म भावनेने केलेल्या स्वच्छताविषयक जाणीवांचा व प्रत्यक्ष स्वच्छता कार्याचा असल्याचे सांगत महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी हा राष्ट्रीय बहुमान समस्त स्वच्छताप्रेमी चंद्रपूरकर नागरिकांना समर्पित केला आहे.
या स्वच्छता महोत्सवात "स्वच्छ सर्वेक्षण 2020” मध्ये देशभरातील 4 हजाराहून अधिक शहरे सहभागी झाले होते. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी करीत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छता अॅपवरही नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय केंद्रातून अनेक नागरिकांस दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे तसेच वेब पोर्टलवरूनही स्वच्छताविषयक प्रश्नावलीतून चंद्रपुरातील नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते.
“स्वच्छ सर्वेक्षण 2020" मध्ये “माझा कचरा - माझी जबाबदारी" या भूमिकेतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे विविध उपक्रमांतून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्याप्रमाणेच लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग लाभला. विविध विभांगामध्ये राबविलेल्या स्वच्छताविषयक अनेक उपक्रमांतून तसेच चित्रकला, निबंध, वक्तृत्व, शॉर्टफिल्म्स, गणेशोत्सव, स्वच्छ सोसायटी, रुग्णालय, शाळा महाविद्यालय, हॉटेल्स अशा स्पर्धा, रॅली, स्वच्छता मोहिमा अशा विविध कार्यक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग झाले व सर्वांनी मिळून शहरात स्वच्छतेचा जागर केला.