चंद्रपूर - उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत साडेचार लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई चिमूर तालुक्यातील खडसंगी या गावाजवळ करण्यात आली. चिमूर तालुक्यातील खडसंगी मार्गावरून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकीमधून तब्बल साडेचार लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाकडून वाहन क्रमांक एमएच 31 सीएम 0221 या चारचाकीवर पाळत ठेवण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री ही चारचाकी नांदकडून खडसंगीकडे येताना दिसली. गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता, गाडीत मोठ्याप्रमाणात दारूसाठा आढळून आला. यामध्ये देशी दारूचे तब्बल 30 बॉक्स आढळून आले. दरम्यान पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून, याप्रकरणी चालक अक्षय शेगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक अमित क्षीरसागर यांनी दिली.