चंद्रपूर - गोंडपिपरी तालूक्यातील विहीर गावामध्ये गरिब कुटुंबातील वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गाव सरसावले. गावखेड्यातील संवेदनशिलतेचा हा उत्तम नमुना म्हणून याकडे पाहिले जात आहे. वृद्धाच्या मृत्यूनंतर पत्नीच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी घराघरातून पैशांसोबतच तांदूळ व इतर अंत्यसंस्काराचे साहित्य जमा करुन अत्यंसंस्कार केले.
हेही वाचा - हिंगोलीत दिवसाढवळ्या पाच घरफोड्या; चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
गोंडपिपरीपासून अवघ्या हाकेचा अंतरावर विहीरगाव आहे. येथे नामदेव आलाम हे वृद्ध पत्नी चिनूबाई सोबत राहत होते. त्यांना दोन मुली आहेत. अतिशय गरिब कुटूंबातील या आईवडिलांनी काटकसर करीत मुलींचे लग्न लावून कर्तव्य पार पाडले होते. आयुष्याचा सायंकाळी हे वृद्ध दांपत्य लहानश्या चंद्रमोळी झोपडीत जीवन कंठत होते. वृद्धापकाळाची मिळणारी तूटपुंजी मदत हाच त्यांच्या जिवन जगण्याचा मार्ग. वयाची पंच्याहत्तरी गाठल्याने नामदेव यांचा शनिवारचा दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.
दोन्ही मुली गडचीरोली जिल्ह्यातील दूर्गम भागात वास्तव्यास असल्याने. जिथे संपर्क होणे कठिण झाले होते. एकटी पत्नी काही करु शकत नसल्याने गावातील नागरिक एकत्र आले. त्यांनी नामदेव यांच्या परस्थितीची जाणीव असल्याने कुठलीही वाट न बघता अत्यंसंस्कारासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करणे सुरू केले. गावातील घराघरातून मदत जमा करण्यात आली. पैशाच्या मदतीसोबतच तांदूळ, गव्हाचे पीठ व इतर साहित्य देत गाव सरसावले. गावातील आबालवृध्दांनी आपआपल्या परीने करता येईल तशी मदत केली. सगळ्यांच्या मदतीने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली. याचवेळी त्यांच्या मुलीही पोहचल्या. शेवटी नागरिकांच्या उपस्थितीत नामदेव आलाम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
हेही वाचा - परभणीत ७ मोटार सायकलसह चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई