चंद्रपूर - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाळूतस्करी विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात वाळूतस्करांविरोधात कारवाई करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. शुक्रवारी रात्री प्रशासनाने केलेल्या एका मोठ्या कारवाईत काँग्रेसचा युवा नेता सचिन कत्याल याचे नाव समोर आले आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेले वाहन कत्याल यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली. मात्र, त्यात कत्याल यांचा समावेश नाही.
कोरोनाचा काळ वाळूतस्करांसाठी सुवर्ण काळ ठरला. यादरम्यान, कोट्यवधीच्या वाळूची तस्करी करण्यात आली. ती वाळू तस्करी अजूनही सुरू आहे. यातील अनेकांना राजकिय वरदहस्त प्राप्त असल्याने प्रशासनही फारसे कारवाईला पुढे धजावत नाही. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाळूतस्करीबाबत नागपूर विभागाची बैठक बोलविली. त्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. यामध्ये विशेष पथक तयार करून वाळूतस्करीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आता कारवाईला सुरुवात झाली आहे.
शुक्रवारी रामनगर पोलिसांनी अजयपूरजवळ अंधारी नदीतील वाळूतस्करीची मोठी कारवाई केली. यात जेसीबी वाहन (क्र. एमएच. 34 एपी. 3433) आणि हायवा ट्रक (क्र. एमएच एएम. 3664) या वाहनांना जप्त करण्यात आले आहे. या वाहनांचे चालक तुळशीराम देवतळे आणि आदिल खान यांनाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली. सोबत 77 हजार रूपये किमतीची 31 ब्रास वाळू, असा एकूण 25 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
यातील जेसीबी हे काँग्रेसचा युवा नेता सचिन कत्याल याच्या नावाची असल्याची माहिती समोर येत आहे. तर हायवा ट्रक हा इलियास खान या व्यक्तीचा आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार, कत्यालने हा जेसीबी 2015 ला घेतली. परिवहन विभागात त्याची 15 डिसेंबर 2015 ला नोंदणी करण्यात आली. त्याचा चेसिस क्रमांक IMOP031 असा आहे. वाळूतस्करीत खुद्द काँग्रेसचा युवा नेत्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. याबाबत कत्याल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद असल्याचे निदर्शनास आले. आता प्रशासन यावर कुठली कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाळूतस्करीतील प्रतिस्पर्धावाळू तस्करीत बक्कळ पैसा असल्याने त्यातही मोठी प्रतिस्पर्धा सुरू झाली आहे. या घटनेला अशाच प्रतिस्पर्धेची किनार आहे. काँग्रेसमध्येच असलेल्या चंद्रपुरातील एका नगरसेवकाने या वाळूतस्करीची तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.