चंद्रपूर - सिदूर गावातील कवडू जनार्दन नीखाडे या शेतमजुराच्या मुलीचे लग्न अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठी पै-पै कमवून त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात जमा करून ठेवली होती. ती रक्कम काढण्यासाठी बँकेत गेले असता त्यांच्या दोन्ही खात्यांमधली एकूण 1 लाख 70 हजारांची रक्कम लंपास झाल्याचे समजले अन् ते हादरून गेले. महादेव निमकर या शेतकऱ्याने पैशांच्या अडचणीमूळे शेत विकले. 20 लाखांची रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेत फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केली. ती रक्कम आता त्यांच्या खात्यात नाही. फक्त कवडू नीखाडे किंवा महादेव निमकर यांचीच ही व्यथा नाही तर जिल्हा बँकेत आपल्या कष्टाचा पैसा गुंतवणाऱ्या शेकडो गरीब, कष्टकरी शेतकऱ्यांवर ही स्थिती ओढवली आहे. 'जर आमच्या आयुष्यभराची कष्टाची मिळकत, अशी लंपास केली जात असेल तर सांगा आम्ही कसे जगायचे'? असा सवाल हे पीडित खातेदार विचारत आहेत.
कवडू नीखाडे भूमिहीन शेती मजूर आहेत. दुसऱ्यांची शेती घेऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या आपल्या भावाची शेती ते करत आहेत. मागच्या वर्षी शेतात 100 क्विंटल कापूस झाला होता. मात्र, यावेळी बोंडअळीने कहर केला. केवळ 40 क्विंटल कापूस त्यांच्या हाती आला. काही दिवसांपूर्वी त्यांचे मुलीचे लग्न जुळले. येत्या 30 एप्रिलला मुलीचा विवाह आहे. त्यामुळे लग्नाची लगबग सुरू झाली. लग्नपत्रिका, येणाऱ्यांचा पाहुणचार, लग्नाचा खर्च यासाठी बाहेरून पैशांची थोडी जुळवाजुळव केली. जिल्हा बँकेच्या खात्यात जे 1 लाख 70 हजार रुपये त्यांनी ठेवलेले होते ते काढण्यासाठी गेले असता एक पैसा देखील त्यांच्या खात्यात नसल्याचे सांगण्यात आले. हालाकीची परिस्थिती, त्यात मुलीचे लग्न आणि आयुष्याची गमावलेली मिळकत, यामुळे गरीब शेतकऱ्यासमोर जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महादेव निमकर यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. त्यांना पैशांची अडचण आली आणि जमिनीचा एक तुकडा त्यांनी विकला. ही 20 लाखांची रक्कम त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली. ही ठेवी देखील लंपास करण्यात आल्याचे त्यांना समजले. ही केवळ सिदूर गावातील कहाणी आहे. मात्र, अशा अनेक खात्यातील शेतकऱ्यांची रक्कम गायब आहे. त्यांनी काय करावे हा प्रश्न त्यांना सतावून सोडत आहे.
बँकेच्या विश्वासाला तडा -
गरीब, शेतकरी, मजूर, सामान्य कर्मचाऱ्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेकडे बघितले जाते. ज्या बँकेच्या शाखेत हा घोटाळा झाला त्या शाखेचे 1 हजार 700 खातेधारक आहेत. यामध्ये सामान्य शेतकऱ्यांसोबत पोलीस विभाग, महानगरपालिका तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या व संस्थांच्या देखील ठेवी आहे. यातील अनेकांच्या खात्यातून रोखपाल घाटे याने रक्कम लंपास केली आहे. 12 फेब्रुवारीला कवडू निखाडे यांचा मुलगा सौरभ हा बँकेत 10 हजार रुपये काढण्यासाठी गेला असता त्याच्या खात्यात रक्कमच नाही, असे सांगण्यात आले. 5 फेब्रुवारीला सौरभने 60 हजार बँकेत जमा केल्याचे सांगितले. तेव्हा त्याला 10 हजार रुपये देण्यात आले. रक्कम जमा का झाली नाही याची विचारणा केली असता रोखपाल घाटे आल्यावर ते करून देणार असे सांगण्यात आले. मात्र, अनेक तास लोटूनही रोखपाल परत आला नाही. याच दिवशी हा घोटाळा समोर आला. त्या दिवसासून रोखपाल पसार झाला आहे. अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.