चंद्रपूर : आज संपूर्ण जगामध्ये महिला दिन साजरा करण्यात येत आहे. महिला सशक्तीकरण यावर मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्याने अनेक ठिकाणी होत आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आजच्या दिवशीच एका 70 वर्षीय आजीला आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. भागरथाबाई धोटे असे या आजीचे नाव असून वेकोली कोळसा खाणीच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही. या विरोधात दोन महिलांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या जागी 70 वर्षीय आजीला उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
जागतिक महिला दिनी 70 वर्षांच्या आजीला उपोषणाला बसण्याची वेळ माजरी-कुचना वेकोली क्षेत्रातील नागलोन या गावातील 11 एकर शेती वेकोली खाणीने अधिग्रहित केली नाही. ही 11 एकर शेती नीता सोमलकर, राखी ठाकरे, रुपम धोटे आणि शुभम डोंगे यांच्या नावाने आहे. जमीन अधिग्रहित केल्यास मोबदल्यासह नोकरी मिळते. या सर्वांना नोकरी मिळणार अशी आशा होती. मात्र, वेकोलीने ही जमीन अधिग्रहित केली नाही. तसेच त्यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. त्यांच्या जागेच्या सभोवताली उत्खनन केलेली माती टाकण्यात आली. त्यामुळे या सर्वांना आता शेती देखील करता येत नाही. या विरोधात नीता सोमलकर आणि राखी ठाकरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. मात्र, उपोषणाच्या सहाव्या दिवशी या दोघींची तब्येत खालावली. त्यांना ७०रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आज जागतिक महिला दिनी रुपम धोटे यांच्या 70 वर्षीय आजी भागरथाबाई धोटे यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. आम्हाला आमच्या शेतीचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी या आजीची आहे. मात्र आज सर्वत्र महिला सशक्तीकरण याच्या गोष्टी होत असताना एका वृद्ध महिलेवर उपोषण करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा - रामाळा तलावाच्या बचावाकरिता प्रशासनाकडून मागण्या मान्य; 12 दिवसांनी सुटले उपोषण
हेही वाचा - नागभीड मार्गावर धावत्या ट्रकने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली