मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वर्ध्याच्या सभेत जोरदार टीका केली होती. आता शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही शरद पवारांवर टीका करताना डोक्यावर 'तिहार'ची टांगती तलवार असल्यानेच पवार अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. महागठबंधन केल्यानेच मोदी यांनी आपल्यावर टीका केली असल्याचे वक्तव्य पवारांनी केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना निशाणा साधला.
पवारांमुळे खरोखरच महागठबंधन झाले आहे का ? मग मायावती आणि अखिलेश यादव एकत्र का आले ? असा प्रश्न विनोद तावडे यांनी केला आहे. विरोधी पक्षांचे महागठबंधन एकत्र आहे असे शरद पवारांनी म्हणणे म्हणजे सुप्रियाताई, अजितदादा, पार्थ, रोहित असे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे, असे म्हणण्यासारखे आहे, असा टोला तावडे यांनी यावेळी लगावला.
राफेल विमान खरेदीत उद्योगपती अनिल अंबानी यांना झुकते माप दिल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही त्यांच्या काळात अंबानींना हजारो कोटी रुपयांची कंत्राट कशी दिली, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला . महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यावेळी मुंबई मेट्रोचे काम अनुभवी डीमआरसी या कंपनीऐवजी अनिल अंबानींच्या कंपनीला देण्यात आले. तेव्हा अनिल अंबानींच्या कंपनीला मेट्रोच्या कामाचा किती अनुभव होता. अंबानींच्या कंपनीने पुढे ६ वर्षे काम रखडल्याने प्रकल्पाची किंमत ८४ टक्क्यांनी वाढली.