मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर आता युतीचे लक्ष लागले आहे ते विधानसभेकडे. येत्या काही दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सदाभाऊ खोत यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मंत्रीमंडळाच्या विस्तारात कृषी खाते हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाईल अशी चर्चा आहे. हे खाते आपल्याला मिळावं यासाठी सदाभाऊ खोत इच्छुक असल्याचे बोलले जातेय. यावर खोत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी मला काम करण्याची संधी दिली यात मी समाधानी आहे.
मुख्यमंत्री मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी जो काही निर्णय घेतील तो निश्चितपणे मला मान्य असेल असे खोत यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत हातकंगणलेची जागा युतीने जिंकली. एकूणच लोकसभेत युतीने चांगलं यश कमावलं यासाठी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो असे खोत म्हणाले.