मुंबई - पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमधील अमित शाहांच्या भूमिकेचं कोडं अखेर सुटलं आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणार असल्याच्या घोषणेनंतर आता भाजप अध्यक्षांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशींची वर्णी लागल्याचं समोर आलं आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून याची घोषणा केली. मात्र, नेटिझन्सना हा निर्णय पसंतीस पडलेला दिसत नसून त्यांनी मनोज जोशींऐवजी सौरभ शुक्लांनी अमित शाहांचा रोल करावा, अशी मागणी ट्विटरवर लावून धरली आहे.
अमित शाहांच्या रोलसाठी मनोज जोशी नव्हे तर शाहांसारखेच दिसणारे कल्लूमामा अर्थात सौरभ शुक्ला यांना संधी द्यायला हवी होती, अशी खंत नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधीचे नेटिझन्सच्या शाह आणि कल्लूमामा यांच्यातील साधर्म्य दाखवून देणाऱ्या ट्विट्सनी धमाल उडवून दिली आहे.
सौरभ शुक्ला यांची सत्या चित्रपटातील कल्लूमामाची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या खऱया नावापेक्षा कल्लूमामा या नावानंच ओळखलं जातं. अमित शाहांच्या भूमिकेमुळं आज नेटकऱयांना पुन्हा एकदा आपल्या लाडक्या कल्लूमामाची आठवण झाल्याचे दिसून आलं.
या चित्रपटात नरेंद्र मोदींचा एका गरीब घरातील मुलापासून पंतप्रधान बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्नदर्शन केलं आहे. विवेक ओबेरॉय, मनोज जोशींशिवाय बोमन इराणी, दर्शन कुमार आणि झरीना वहाब या अभिनेत्यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.