बुलडाणा - एकीकडे कोविड-19 मुळे जग थांबले असताना सर्वसामान्य माणूस पोटाची खळगी कशी भरली जातील, याच विवंचनेत होता. लॉकडाऊनच्या काळात काय करावे, हे अनेकांना कळत नव्हते. शहरे आणि गावे ओसाड झाली होती. अशाच एका गावात मात्र शिक्षणाचे महत्त्व आणि गोडी वाढावी यासाठी गावकरी आणि गावातील तरुण अहोरात्र झटत होते. सोशल डिस्टन्ससिंग राखून लोकवर्गणीतून बोलक्या भिंतींचे काम या गावातील तरुणांनी हाती घेतले. यातूनच ही शिक्षणासाठी उभारलेली लोकचळवळ ठरली. तर चला मग, पाहूया शिक्षणाचा झरा घरा-घरात पोहचवणाऱ्या या आदर्श गावाची कहाणी..
माँसाहेब जिजाऊंचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात ताडशिवणी नावाचे हे छोटसे गाव. आता या छोट्याशा गावातील ही शाळा बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, खरंच का ही जिल्हा परिषदेची शाळा? पण ही दृश्य वास्तव दर्शवणारी आहेत. या जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यात गावकऱ्यांसोबत याच छोट्या शाळेत शिक्षण घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून पोहचलेल्या एका व्यक्तिमत्वाचा सुद्धा तेवढाच मोठा वाटा आहे. सिद्धार्थ खरात असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून राज्यातील शिक्षणाचा कार्यभार सांभाळणाऱ्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन राज्यासमोर शिक्षण क्षेत्रातील हा शैक्षणिक गड माँ जिजाऊंच्या माहेरात रचलाय.
लोकवर्गणीतून शाळेच्या भिंतींना 'बोलक्या भिंतीं'चे रूप
खासगी शाळांमध्ये आकर्षक इमारत, विविध रंगाने रंगलेल्या भिंती आणि अत्याधुनिक सुख-सुविधा दिसून येतात. मात्र, ग्रामीण भागात छोट्याशा खेड्यात कोण अशी शाळा उभारणार? आणि उभारली तरी सुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी एवढी फी सामान्य शेतकरी व मजूर भरू शकतील का? त्यामुळे आजही ग्रामीण भागात पडझड झालेल्या, जीर्ण इमारत असलेल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा दिसून येतात. पण आता ताडशिवणी गाव याला अपवाद ठरले आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. त्याचबरोबर गावातील विविध घरे, शौचालये व इतर भिंतींवरही शिक्षणाशी संबंधित आकर्षक चित्रे व घोषवाक्ये, सुविचार लिहून लहान मुलांमध्ये शिक्षणात रुची निर्माण व्हावी, यासाठी या बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदची शाळा म्हटली म्हणजे निधी कोण देणार? कधी मंजूर होणार? यासर्व गोष्टी मध्ये न पडता गावकऱ्यांनी 50-100 रुपये, 500 रुपये आपआपल्या परीने जमा करून लोकवर्गणीच्या माध्यमातून शिक्षणाचे हे नंदनवन उभे केले आहे. येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्येक गावांनी जर हा आदर्श घेतला तर, नक्कीच ताडशिवणी पॅटर्न राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे शेतकरी मजूर व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये गावा-गावात शिक्षणाची गोडी निर्माण होण्याचे काम होईल. ओसाड पडलेल्या जिल्हा परिषदच्या शाळांमधून नवीन राष्ट्र निर्माण करणाऱ्या उच्चशिक्षित अशी युवा साक्षर पिढ्या या बोलक्या भिंती बघून उदयास येत राहतील.
हेही वाचा - परदेशी शिष्यवृत्तीवरही सनदी अधिकाऱ्यांनी मारला डल्ला; गोरगरीब विद्यार्थ्यांची संधी हुकली
बोलक्या भिंती व एक दिवा ज्ञानाचा उपक्रम युवकांनी पुढे येवून राबविला - सिद्धार्थ खरात
एखाद्या समाजाची, एखाद्या गावाची किंवा एकूण आपल्या भागाची प्रगती करायची असेल तर तेथील युवक कल्पक असला पाहिजे. त्याच्याकडे रचनात्मक काम करण्याची दृष्टी असली पाहिजे. असा युवा असेल तर त्या देशाचा, त्या गावाचा, त्या भागाचा सगळ्याच बाबतीत विकास झाल्या शिवाय राहणार नाही, हे ताडशिवणी या गावात राबविण्यात आलेल्या उपक्रमातून दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात या युवकांच्या डोक्यात नव्या कल्पना होत्या. या जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांनी 'बॅक टू जिल्हा परिषद शाळा' असा उपक्रम राबविला. ही सुरुवात 35 ते 40 वर्षानंतर सुरू झाली आहे. 35 वर्षानंतर माझ्या गावाचा युवक जागृत झाला आहे. हा नोकरीला लागलेला, उद्योग करणारा युवक वर्ग आहे. त्यांनी एकत्र येत 256 जणांचा ग्रुप केला आहे. यांच्या गावाबाहेर असलेलेही लोक आहे. ते ग्रामपंचायतीची मदत घेत नाहीत. शासनाच्या कुठल्या योजनांची मदत घेत नाहीत. बोलक्या भिंतींनंतर वाचनालय, व्यायाम शाळा, वृक्ष लागवड असे उपक्रम हाती घेऊ, असे या ग्रुपचे म्हणणे आहे.
आयएएस राहुल कर्डीले यांच्या फेसबुक पोस्टवरून हा उपक्रम राबविला - जितेंद्र भांबर्डे
आयएएस राहुल कर्डीले यांची फेसबुकवरील एक पोस्ट पाहून या उपक्रमाची कल्पना सुचल्याचे जितेंद्र भांबर्डे यांनी सांगितले. कर्डीले यांनी 'बोलक्या ज्ञानबाई भिंतीं'चा कार्यक्रम राबवला होता. हा कार्यक्रम आपल्या गावातही राबविला गेला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा संपर्क शाळेपासून तुटल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होवू नये, या दृष्टीने प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. गावात भूगोल, इतिहास, गणित, मराठी आणि अभंगवाणी यांचा समावेश असलेले 50 बोर्ड बनविले. शिक्षणाच्या बाजारीकरणाला फाटा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवल्या पाहिजेत. त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल. गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेला नवे रूप देण्याचा प्रयत्न केल्याचे भांबर्डे म्हणाले.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : प्रत्येक हुतात्मा जवानाच्या कुटुंबाला पत्र लिहणारा अवलिया