बुलडाणा - शेगाव नगर परिषदेत शिपाई पदावर कार्यरत असताना मृत्यू झालेल्या शिपाईच्या मुलींचे नाव अनुकंपा यादीत समाविष्ट करावे, तसेच तिला नोकरी द्यावी, या मागणीसाठी महिलेने 27 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज तिच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
यादीतून काढले नाव -
शेगाव नगर पालिकेत भीमराव गायकवाड हे शिपाई पदावर कार्यरत होते. मात्र, 2011 मध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी कुसूम गायकवाड यांनी अनुकंपा तत्त्वावर शिपाई या पदावर नोकरी मिळावी, यासाठी 2011 पासून नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. प्रथम त्यांचे अनुकंपाच्या यादीत नाव आले. नंतर त्यांचे यादीतून काढण्यात आले.
वयोमर्यादा संपल्याचे दिले कारण -
11 वर्षांपासून अनुकंपा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही नाव समाविष्ट न करता आता वयोमर्यादा संपल्याने तुम्हाला नोकरी देता येत नसल्याचे मृतक भीमराव गायकवाड यांच्या पत्नी कुसुम गायकवाड यांना सांगण्यात आले. याविरोधात कुसुम यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर त्यांनी 27 जानेवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात करून अनुकंपाच्या प्रतिक्षा यादीमध्ये माझ्या मुलीचे नाव समाविष्ट करून मुलीला नोकरी देण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका कुसूम गायकवाड यांनी घेतली आहे.
हेही वाचा - नवीन कृषी कायद्यांमुळे मुक्त बाजाराचे नवे युग सुरू होणार-आर्थिक सर्वेक्षण