बुलडाणा - जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल होत असतानाच पुन्हा बुलडाणा जिल्ह्यात ५ नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये काही रुग्ण परराज्यातून तर काहीजण हे पर जिल्ह्यातून आले आहेत. १७ में पर्यंत दुसऱ्या जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार नागरिक ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. म्हणूनच बुलडाणा जिल्ह्यावर पर जिल्ह्यातील कोरोनाचे सावट असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये कामानिमित्त आणि नोकरीसाठी गेलेले अनेक नागरिक बाहेर जिल्ह्यात अडकून पडले होते. अशातच बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेले औरंगाबाद, अकोला, जळगाव आणि मध्यप्रदेशचे बुऱ्हाणपूर हे जिल्हे सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता रेडझोनमध्ये आहे. बुलडाणा जिल्ह्यात १० में पर्यत आढळलेल्या २४ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होऊन २३ रुग्णांना सुट्टी देण्यात आली होती. जिल्हा ग्रीनझोनकडे वाटचाल करीत असतानाच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११ में ला जळगांव जामोदला एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. तो मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूरला नातेवाईकाच्या अत्यंविधीला गेला होता. ८ वर्षीय चिमुकलीला जे जे रुग्णालयातून स्वॅबचे नमुने घेतल्यानंतरही सुट्टी देण्यात आली आणि ती कोरोनाबाधित आढळून आली. तर मुंबईला जिल्ह्यातील एका जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवारातील सदस्यांपैकी एक मुलगी कोरोनाबाधित आढळून आली.
खांमगाव येथील ६० वर्षीय महिलाही कोरोनाबाधित आढळून आली. तीदेखील मुंबईला गेल्याचे बोलले जात आहे. शिवाय शेगांव येथील सफाई कामगारदेखील कोरोनाबाधित आढळून आला आहे.अशा एकूण ५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. १७ में पर्यंत ८६९ ग्रामपंचायतीमध्ये पर जिल्ह्यात असणारे बुलडाणा जिल्ह्यातील ७७ हजार ६६० नागरिक दाखल झाले असून, त्यापैकी ७७ हजार ४३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ७७ हजार १९७ नागरिकांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहे. तर १४७ नागरिकांना सर्दी खोकला असल्याची लक्षणे आहेत. म्हणूनच बुलडाणा जिल्ह्यावर पर जिल्ह्यातील कोरोनाचे सावट असल्याचे दिसत आहे.