बुलडाणा - अज्ञात वाहनाच्या धडकेत एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे. उद्धव बाबुराव सानप असे त्या जवानाचे नाव आहे. सानप हे आसाम येथे सैन्यदलात कार्यरत होते. ते मार्च २०१९ मध्येच सेवानिवृत्त होणार होते, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी ते सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजई येथे आले असता, त्यांचा अपघात झाला.
कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी गावाकडे २८ फेब्रुवारीला आलेले सानप २ दिवसात परत आसामला जाणार होते. तत्पूर्वी १ तारखेला देऊळगावराजा तालुक्यातील दगडवाडी (रघवीर वाडी) येथे आपल्या बहिणीकडे आले होते. बहिणीच्या कुटुंबीयांना भेटून देऊळगावराजाकडे परतत असताना चिखली रोडवर शुक्रवारी रात्री त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
सानप यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पी.एस.आय. भोसले करीत आहे.