बुलडाणा - खामगाव संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे ३ जागांची मागणी केली आहे. तसे न झाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढू. लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाईल, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, ९ डिसेंबर २०१८ रोजी औरंगाबाद येथे संभाजी ब्रिगेडचा स्वराज्य संकल्प मेळावा झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी युतीसाठी निमंत्रण दिल्याचे सिंदखेड राजा येथे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत काही बैठकाही झाल्या. आम्ही बुलडाणा, वर्धा आणि पुण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर आमच्या काही मागण्या आहेत. पण अजून युतीचा अंतिम निर्णय झालेला नाही. १८ मार्चपर्यंत युतीचा निर्णय झाला नाही, तर संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे.
बहुजन मताचे विभाजन होऊ नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करायला संभाजी ब्रिगेड तयार आहे. परंतु संभाजी ब्रिगेडचा अजेंडा, काही अटी-शर्ती जर काँग्रेसने मान्य केल्या तर युती होऊ शकते, असे डॉ. भानुसे म्हणाले. अन्यथा आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. कुणाला फायदा कोणाला तोटा होईल याचा विचार आम्ही करणार नाही, असे डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले.