बुलडाणा - बियाणे महांडमळाने मार्चमध्ये शेतकऱ्यांकडून घेतलेले बियाणे जुलैमध्ये परत केले आहे. सध्या सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विटंल 700 रुपये नुकसान सोसावे लागणार आहे. ही नुकसान भरपाई महामंडळाने द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यामुळे रविकांत तुपकर यांनी आज (शनिवारी) बुलडाण्याच्या बियाणे महामंडळाच्या कार्यालयात धडक जावून संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. महामंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी यावेळी तुपकर यांनी केली. बियाणे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मारोडे यांना तुपकर यांनी चांगलेच धारेवर धरले. तात्काळ
नुकसानभरपाई द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा त्यांनी इशारा दिला. यावेळी राणा चंदन, शेख रफिक शेख करीम, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 700 रुपयांचे नुकसान
शेतकऱ्यांनी बियाणे महामंडळाला डिसेंबर 2019 मध्ये सोयाबीन बियाणे दिले होते. हे बियाणे महामंडळाने सोयाबीन तपासून नापास झाल्याचे मार्च 2020 मध्ये शेतकऱ्यांना कळविले. त्यावेळी सोयाबीनचा बाजारभाव 4 हजार 200 रुपये प्रति क्विटंल होता. परंतु बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांची संमती न घेता सोयाबीनची पुन्हा तपासणी केली. त्यानंतर जूलै 2020 मध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पुन्हा नापास झाल्याचे कळविले. सोयाबीनचा आज बाजारभाव हा अंदाजे 3 हजार 500 रुपये प्रति क्विंटल आहे. महामंडळाने बियाणे जर शेतकऱ्यांना मार्चमधेच परत केले असते तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. परंतु बियाणे महामंडळाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना सोयाबीन 3 हजार 500 च्या भावाने विकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल 700 रुपयांहून अधिक नुकसान होणार आहे.