बुलडाणा - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिसांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टारगेट दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायालयाने सीबीाय चौकशीचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार आता अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. मात्र सीबीआय ज्या पद्धतीने देशमुख यांची चौकशी करत आहे, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. ते बुलडाण्यात बोलत होते.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची बैठक
जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर निर्माण होणारा ताण, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा या पार्श्वभूमीवर रविवारी पालकमंत्री शिंगणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंगणे यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - कोव्हिडमध्येही प्रामाणिकपणा जीवंत, मजुराने सापडलेले ९७ हजार दिले पोलिसांना