बुलडाणा - शेगाव तालुक्यातील पहुरजीरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मनीषा शेंबडे या शिक्षिकेने पाचवीतील तीन विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेमुळे ते आजारी पडले होते. हा प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणला होता. याची दखल घेत शेगावचे गट शिक्षणाधिकारी केवट यांनी पीडित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी शिक्षिका मनीषा शेंबडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - जिप शाळेतील तीन विद्यार्थ्यांना २०० उठाबशांची अघोरी शिक्षा, शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल
पहुरजीरा प्राथमिक शाळेत 29 फेब्रुवारीला पाचवीमध्ये शिकणारे तीन विद्यार्थी दंगा करत होते. यावर मनीषा शेंबडे या शिक्षिकेने या तिन्ही विद्यार्थ्यांना 200 उठबश्या काढण्याची शिक्षा दिली. यावेळी ज्ञानेश्वर मेटांगे नामक विद्यार्थी 70 उठबश्या काढल्यानंतर रडायला लागल्याने त्याला थांबवण्यात आले. मात्र, ओम तळपदे आणि ज्ञानेश्वर पारस्कार या दोन्ही विद्यार्थ्यांना 200 उठबश्या पूर्ण करायला लावल्या. यामुळे तिन्ही विद्यार्थ्यांच्या पायाच्या पोटऱ्या सुजून ते आजारी पडले होते. याप्रकरणी पालकांनी शिक्षिका मनीषा शेंबडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.