बुलडाणा - तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी अळी अर्थात घाटे अळी, पिसारी पतंग, शेंग माशी या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून तूर पिकाचे व्यस्थापन करावे असे आवाहन बुलडाणा कृषी विभागाने केले आहे.
शेंगा पोखरणाऱ्या किडीस हिरवी अळी, घाटेअळी आदी नावांनी संबोधण्यात येते. ही किड बहुभक्षी कीड असून हरभरा, वाटाणा, सोयाबीन, चवळी आदी कडधान्य पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवायी कपाशी, ज्वारी, टमाटे, सुर्यफूल, करडई या पिकांवरसुद्धा आढळून येते.
शेंगा पोखरणाऱ्या किड पतंग -
शेंगा पोखरणाऱ्या किडीची पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो. पंखाची लांबी सुमारे 37 मी. मी असते. पुढील तपकीरी पंख जोडीवर काळे ठिपके असतात. तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. पुर्ण वाढ झालेली अळी 37-50 मी.मी लांब असून पोपटी रंगाची असली तरी विविध रंग छटा असलेल्या अळ्याही दृष्टीस पडतात. अळीच्या शरीराच्या बाजुवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची व गोलाकार असतात. या अंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटकार असतो. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागांवर केसांचा झुपका असतो.या किडीची मादी सरासरी 600 ते 800 अंडी तूरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालत असते. अंडी अवस्था 3 ते 4 दिवसांची असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठ कुरतडून खातात.
डिसेंबर ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव -
डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आभाळ अच्छादित असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. ही अळी सहा अवस्थांमधून जावून 18-25 दिवसांनी जमिनीत मातीच्या वेष्ठनात अथवा झाडाच्या पालापाचोळ्यात कोषावस्थेत जातात. कोषअवस्था 7 ते 14 दिवसांची असते. या किडीचा जिवनक्रम 4-5 आठवड्यात पूर्ण होतो.तूर पिकावर येणारी दुसरी महत्वाची किड पिसारी पतंग आहे.हा पिसारी पतंग नाजूक निमुळता 12.5 मि.मी लांब करड्या/भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असतात. त्यांच्या कडांवर नाजूक केसांची दाट लव असते. पुढील पंख खूप लांब असून त्यांचे पाय लांब व बारीक असतात. त्यामुळे त्यांना पिसारी पतंग म्हणतात.
शेंगमाशी -
शेंगमाशी ही आकाराने फारच लहान 1.5 मि.मी लांब असते. माशीचा रंग हिरवट असतो. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. पुढील पंखाची लांबी 4 मि.मी असते. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो. शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. मात्र जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. ही अंडी 3 ते 8 दिवसात उबून त्यातून निघणारी अपाद अळी सुरूवातीस दाण्याचा पृष्ठभाग कुरतडून खाते, त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात. एक अळी एका दाण्यावरच दरभरण करून जिवनक्रम पुर्ण करते. जिवनक्रम पुर्ण होईपर्यंत अळी शेंगेतच राहते. अळी अवस्था 10 ते 18 दिवसांची असून पुर्ण वाढ झालेली अळी शेंगेतच राहते. कोष दाण्याच्या बाहेरपण शेगंगेतच असतो. कोषावस्था 4 ते 9 दिवसांची असते. माशीची अळीने शेंगेत जाण्यापूर्वी तयार केलेल्या छिद्रावरील पातळ आवरण फोडून कोषामधून निघालेली माशी शेंगेच्या बाहेर पडते. शेंग माशीचा जीवनक्रम 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होतो.
नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन -
या किडींच्या नियंत्रणासाठी तृणधान्य व तेलबिया पिकांबरोबर पिकांची फेरपालट करावी, पेरणीपूर्वी मशागत खोल नांगरणी व वखरणी करावी, वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी, अळ्या वेचून त्यांचा नाश करावा, हेक्टरी 20 पक्षीथांबे पिकात उभारावीत, घाटे अळीच्या नियंत्रणाकरीता त्या अळीचा विषाणू (एचएनपीव्ही) प्रति हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा, शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क फवारावा.
तसेच या किडीच्या नियंत्रणाकरीता 50 टक्के फुलोऱ्यावर असताना पहिली फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मि.ली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मि.ली किंवा एचएनपीव्हीएच (1 x 100 पीओबी / मिली) 500 एल ई / हेक्टर किंवा बॅसिलस थुरीजीएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. इमामेक्टीन बॅन्झोएट 5 टक्के 3 एसजी 4.4 ग्रॅम किंवा लॅमडा सायहेलेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 15.5 एससी प्रवाही 2.5 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.